३३ कोटी' यात 'कोटी' चा अर्थ 'करोड' म्हणजे एकावर सात शून्य असा होत नाही.
३३ कोटी' यात 'कोटी' चा अर्थ 'करोड' म्हणजे एकावर सात शून्य असा होत नाही. या कोटीचा अर्थ 'पराकोटी', 'उच्चकोटी' या शब्दांसारखा म्हणजे 'प्रकार' असा होतो. तेव्हा ३३ करोड देव नसून ३३ प्रकारचे देव आहेत.
आता हे देव कोणते. तर त्या बाबतीत सर्वात जुन्या साधनांकडे गेले तर सर्वात विश्वसनीय माहिती मिळेल. ३३ देवांची यादी सांगणारा सर्वात जुना ग्रंथ म्हणजे शतपथ ब्राह्मण.
टीप: वैदिक देव म्हणजे पुराणात वर्णलेले स्वर्गात राहून मजा मारणारे मानवी भावना असलेले देव नाहीत. वेदांची भाषा अलंकारिक असून वैदिक देवता ह्या चैतन्यस्वरूप देवता आहेत. ही दैवी तत्त्वे आहेत.
शतपथ ब्राह्मण, कांड ११, अध्याय ६, बाह्मण ३.
[जनक राजाच्या यज्ञात]
शाकल्य ऋषि: देव किती आहेत?
याज्ञवल्क्य ऋषि: तीनशे तीन … तीन हजार तीन.
शा: हे तुमचे उत्तर आहे? तीनशे तीन; तीन हजार तीन! आणखी काही उत्तर नाही का?
या: तेहतीस.
शा: पुन्हा, देव किती?
या: सहा.
शा: बरे. परत एकदा विचार करून सांगा किती देव.
या: तीन.
शा: परत एकदा विचार करून सांगा किती देव ते.
या: दोन.
शा: किती देव?
या: दीड.
शा: किती देव?! (काय मस्करी चालली आहे काय?)
या: एक देव!
शा: मग ते तीनशे तीन आणि तीन हजार तीन सांगितलेत ते देव कोण?
या: त्या केवळ महिमा आहेत. वास्तवात तेहतीस देव आहेत.
शा: मग कोण आहेत हे तेहतीस देव?
या: आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य हे एकतीस, त्यात इंद्र आणि प्रजापति मिळून तेहतीस.
शा: हे आठ वसु कोण?
या: अग्नि, पृथ्वी, वायु, अंतरिक्ष, सूर्य, द्यौ, चंद्रमा आणि नक्षत्र हे वसु. सर्व काही यांच्याच मूलभूत तत्त्वांच्या रूपात आहे म्हणून त्यांना वसु म्हणतात.
शा: हे रुद्र कोण?
या: दहा पुरुषाचे प्राण (प्राण, अपान, उदान, व्यान, समान हे प्राण आणि नाग, कूर्म, कृकल, धनंजय, देवदत्त हे उपप्राण ) आणि एक आत्मा. मनुष्याला रडवतात म्हणून त्यांना रुद्र असे म्हणतात.
शा: आदित्य कोण आहेत?
या: हे आदित्य म्हणजे वर्षाचे बारा मास. ते सर्वांना घेऊन जातात (आददाना यन्ति) म्हणून त्यांना आदित्य असे म्हणतात.
शा: इंद्र कोण आहे? प्रजापति कोण आहे?
या: पावसाळी ढग म्हणजे इंद्र आणि यज्ञ म्हणजे प्रजापति.
शा: पावसाळी ढग म्हणजे?
या: म्हणजे वीज. (प्रत्येक जीवात असलेले कारक ऊर्जा चैतन्य/spark)
शा: यज्ञ म्हणजे?
या: यज्ञ म्हणजे पशु. (पुरुषसूक्तात विराट्-पुरुषालाच यज्ञिय पशु मानले आहे.)
मग पुढे ऋषि शाकल्य ऋषि याज्ञवल्क्यांना सहा, तीन, दोन, दीड आणि शेवटी एका दिवाविषयी विचारतात आणि अशा प्रकारे हा शास्त्रार्थ पुढे चालू राहतो. हाच संवाद बृहदारण्यक उपनिषद् अध्याय ३ मध्येही येतो.
म्हणजे ८ वसु, ११ रुद्र, १२ आदित्य, इंद्र आणि प्रजापति असे ३३.
याशिवाय शतपथ ब्राह्मण कांड ४, अध्याय ५, ब्राह्मण ७ मध्येआणखीन एक यादी दिसते: ८ वसु, ११ रुद्र, १२ आदित्य, पृथ्वी आणि द्यौ असे ३३, आणि प्रजापति यज्ञ म्हणून ३४वा असे म्हटले आहे. परंतु त्यात गटांतील देवांच्या नावांचा उलगडा दिसत नाही. त्यानंतर इतिहास आणि पुराणांतही तेहतीस देवांच्या याद्या दिसतात. परंतु शतपथ ब्राह्मण श्रुति असल्यामुळे त्यालाच प्रमाण्याच्या क्रमात ते वर येते. तसे शतपथ ब्राह्मणातही दोन याद्या दिसतात. त्यामुळे त्या काळी ही ऋषिंजनांमध्ये या बाबतीत मतभेद असावेत. चौथ्या कांडातील यादीत तसे ही एकूण ३४ देव होतात, आणि त्यात देवांविषयी स्पष्टीकरणही नाही. त्यामुळे अकराव्या कांडातील यादीच ग्राह्य वाटते. असो. मी एक अभियंता आहे, वेदाचार्य नाही, त्यामुळे चूक झाल्यास क्षमस्व.
Comments
Post a Comment