सीता ही रावणाची मुलगी होती का? यात तथ्य आहे का?

सीता ही रावणाची मुलगी होती असे बऱ्याच जणांचे मत आहे. उत्तर थोडे मोठे होईल.

झाले असे…

रावणाने कुबेराकडून लंका जिंकून घेतली आणि लंकेचा तो राजा झाला.भविष्यवेत्त्यांनी तुला होणारे पाहिले अपत्य तुझ्या लंकेच्या विनाशास कारण होईल असे रावणास सांगितले.रावणाचा मामा मारीच आणि इतर दरबारी तेव्हा तेथे उपस्थित होते. रावणाने हे सगळे हसल्यावारी नेले पण हे भविष्य ऐकून मारीच हादरला. सगळे भयभीत झाले.एवढे कष्टाने मिळविलेले साम्राज्य फक्त एका अपत्यामुळे लयास जाणार असे वाटून जो तो चिंता व्यक्त करू लागला. रावणाने सगळ्यांना शांत केले आणि मूल जन्माला आल्यानंतर बघता येईल असे म्हणून वेळ मारून नेली.

रावणाला यथावकाश मुलगी झाली.रावणाला ते गोंडस बाळ पाहून खूप हर्ष झाला.तशी दवंडी लंकेत पिटविण्यात आली.मारीच आता मात्र लंकेवरच्या भावी संकटाने घाबरला. सगळे दरबारी पुन्हा चिंतेत पडले त्यांना भविष्यवेत्त्यांचे भविष्य आठवले.त्या मुलीला नष्ट करण्यात यावे असे रावणाला सुचविण्याचे ठरले पण कुणाचीच रावणाला तोंड देण्याची हिम्मत नव्हती.सर्वांनी हे काम मामा मारीच याच्या कडेच सोपविले.

मारीच याने रावणाजवळ हळूच विषय काढला आणि भयंकर भविष्याची आठवण दिली.तुझ्या मुलीला नष्ट करण्यातच आपल्या लंकेचे हित आहे असे सांगितले. पण रावण मारीचावरच उसळला.असे कदापि होणार नाही असे सांगितले.मारीच निराश झाला.

आता मात्र रावण सावध झाला.आपल्याच दरबाऱ्यांपासून आपल्या मुलीला धोका आहे हे त्याने ताडले. त्याने डोळ्यात तेल घालून स्वतःच्या प्रिय मुलीवर लक्ष ठेवले. इतकेच नाही तर कुठे युद्धाला जायचे असेल तरी त्या लहान बाळाला तो सोबत घेऊन जाऊ लागला.

एकदा असेच मध्यभारतात रावण मारीचासोबत युद्धासाठी गेला होता.सोबत अर्थातच त्याची लाडकी मुलगी होती.तिचे रक्षण करण्याची जबाबदारी मारीचाकडे सोपवून रावण सैनिकांसमवेत आघाडीवर गेला.

मारीच ज्या संधीची वाट बघत होता ती सापडली.ती गोंडस मुलगी त्याच्याकडे बघून हसत होती पण मारीचाच्या मनात तिला नाहीसे करण्याचे मनसुबे चालले होते.त्याचा हात तलवारीजवळ गेला पण त्यामुलीने त्याचे बोट घट्ट पकडले.त्या निष्पाप चेहऱ्याकडे बघून त्याला तिला मारावेसे वाटेना.त्याची मनस्थिती द्विधा झाली.त्याने एका विश्वासू सेवकाला रावणाच्या मुलीला घनदाट जंगलात नेऊन मारण्यास सांगितले.तो सेवक तिला हातात घेऊन जंगलात शिरला.बराच वेळ त्याची पायपीट चालली होती.इतक्या वेळात त्या सेवकाच्या मनात त्या मुलीविषयी करुणा उत्पन्न झाली.त्या मुलीला आपण न मारता सोडून देऊ आणि मारीचाला तिला मारल्याचे सांगू असे त्याने मनात ठरविले.पण एवढ्याशा बाळाला कुठे सोडावे हेच त्याला समजत नव्हते.

ह्या विचारात चालत असतांना त्याचा पाय पाऊस झाल्यामुळे तयार झालेल्या खड्डयातील गाळात रुतला.त्यात अचानक त्याला दुरून माणसांचे बोलणे ऐकू येऊ लागले.तो घाबरला.त्याने त्या मुलीला गाळात ठेवले, स्वतः धडपड करून कसातरी बाहेर पडला आणि जवळच्या उंच झाडावर लपून बसला.

वैदेह अर्थात मिथिला नगरीचा राजा जनक त्याच्या शेतावरून सैनिकांसोबत राजवाड्याकडे परतत होता.लहान बाळाचे रडणे त्यांच्या कानावर पडले.राजा जनक त्या खड्ड्याजवळ आला.त्याला सुंदरसे बाळ गाळात पडलेल्या अवस्थेत दिसले.त्याने ताबडतोब सेवकांच्या मदतीने जवळचा नांगर गाळात टाकला.त्या नांगराच्या मदतीने त्याने त्या मुलीला बाहेर काढले. ही मुलगी कोण येथे ठेवून गेले असावे असा प्रश्न त्याला पडला.त्याने आसपास शोध घेतला परंतु शोध लागला नाही. अपत्यहीन जनकाने ती मुलगी परमेश्वराचा प्रसाद मानून तिचा सांभाळ करण्याचे ठरविले.

मारीचाचा सेवक झाडावरून सगळे बघत होता.जनक त्या मुलीला घेऊन निघून गेल्यावर तो खाली उतरला.त्याला त्या मुलीला कोणीतरी सज्जन लोक घेऊन गेले याचा आनंद झाला.पण मारीचाला काय सांगायचे असा प्रश्न त्याला पडला.त्याने आपलेच बोट तलवारीने कापले आणि त्याचे रक्त मारीचाला दाखविले आणि काम फत्ते केल्याचे सांगितले.मारीचाला आनंद झाला.आपली लंका भावी संकटातून बचावली याचा त्याला आनंद झाला.

त्याने रावणाला काय सांगायचे ह्याचे उत्तर तयार ठेवले होते.परतल्यानंतर रावणाने मुलगी कोठे आहे असे मारीचाला विचारले.वन्य श्वापदांनी अचानक हल्ला केला आणि मुलीला ओढून घेऊन गेले असे सांगितले. रावणाने क्रोधीत होऊन मारीचाला खूप शिव्या दिल्या.मोठाच संताप केला.तो मारीचाला मारण्यास धावला पण इतर सैनिकांनी त्याला ओढले.रावणाला त्याच्या मुलीचा चेहरा आठवून रडू कोसळले.त्याला कसेबसे लंकेत आणले गेले पण मुलीच्या वियोगाच्या दुःखातुन त्याला बाहेर पडणे जमले नाही.

मध्यंतरी बरीच वर्षे गेली.जनक राजाची मुलगी सीता उपवर झाली.तिला पराक्रमी पती लाभावा म्हणून जनकाने सीतेचे स्वयंवर करण्याचे ठरविले.देशोदेशीच्या राजांना स्वयंवराचे आमंत्रण गेले.रावणालाही आमंत्रण गेले.जनकाला मुलगी नव्हती हे त्याला माहित होते. अपत्यहीन असलेल्या जनकाला मुलगी कधी झाली आणि ती लग्नायोग्यही झाली याचे आश्चर्य रावणाला वाटले.अधिक चौकशीसाठी त्याने निवडक लोकांना मिथिलेत जाऊन खरे काय ते जाणून घेण्यास सांगितले. सेवकांनी जनकराजाला ही मुलगी बऱ्याच वर्षांपूर्वी जंगलात सापडली असे रावणाला गुप्तरीत्या चौकशी करून आल्यानंतर सांगितले.रावणाला त्या काळात तो युद्धासाठी त्या भागात गेल्याचे त्याला स्मरले.सीता ही आपलीच मुलगी आहे असा संशय रावणाला आला.

त्याने मारीचाला आता ताब्यात घेतले.खरे सांगण्यास सांगितले नाहीतर तू माझा मामा आहे हे मी विसरून जाईल आणि तुझा शिरच्छेद करेन असे धमकावले. मारीचाने घाबरून सर्व वृत्तांत कथन केला.ज्या सेवकाला मारीचाने सीतेला जंगलात मारण्यास सांगितले होते त्याला बोलाविण्यात आले.त्याने जसे घडले तसे सांगितले आणि जनकराजा तुमच्या मुलीला घेऊन निघून गेला हे स्वतः बघितल्याचे सांगितले. मारीचाने आपण हे लंकेच्या आणि पर्यायाने आपल्या भल्यासाठी केले असे रावणाला स्पष्टीकरण दिले.इतर दरबारीं लोकांनी मारीचाला पाठिंबा दिला.रावणाचा क्रोध काहीसा कमी झाला.

रावणाने मारीचाला आणि सेवकाला मोठ्या मनाने माफ केले आपली मुलगी जिवंत आहे ह्याचाच त्याला खूप आनंद झाला.आता तिला आपल्या हक्काच्या पित्याच्या घरी लंकेत आणू आणि स्वतः तिचे लग्न एखाद्या सम्राटाशी लावून देऊ असे त्याच्या मनाने घेतले.

त्याने सीतेच्या आणण्यासाठी मिथिलेत जाण्याचे ठरविले. जनकाला सर्व इतिहास सांगून सीतेला परत आणण्याचा त्याचा मानस होता.त्याला मिथिलेत पोहोचायला उशीर झाला.तो पोहोचला तेव्हा सीतेचे स्वयंवर चालू होते.शिव धनुष्याला दोरी बांधण्याची प्रतियोगीता तेथे चालू होती.जो दोरी बांधेल त्यालाच सीता माळ घालणार होती.रावण हतबुद्ध होऊन बघत होता.त्याने नशिबाला दोष दिला.आता सीतेने एखाद्या चांगल्या वराला निवडावे म्हणजे झाले असे त्याला वाटले.

तेवढ्यात टाळ्यांचा कडकडाट आणि जयजयकार झाला.कुठल्यातरी अयोध्या नावाच्या किरकोळ आणि छोट्या राज्याच्या राजकुमाराने ज्याचे नाव राम होते त्याने शिवधनुष्याला प्रत्यंचा बांधण्यात यश मिळविलेले रावणाला दिसले.रावणाला हे अजिबात आवडले नाही कारण लंकेसमोर अयोध्या हे त्याच्या दृष्टीने अगदीच छोटे राज्य होते.रामाबद्दल त्याला चांगल्या गोष्टी समजल्या तेव्हा त्याने आपला राग गिळला.कुणाशी काहीच न बोलता मारीचसोबत तो पुन्हा लंकेला आला.आता आपल्या मुलीला राम सर्व सुखे देईल का अशी चिंता त्याला पडली.

पण काही दिवसातच नेसत्या वस्त्रांनीशी राम सर्व राज्याचा त्याग करून वनवासात सीतेसोबत निघाला ही वार्ता त्याच्या कानावर पडली.आधीच त्याला हे स्थळ पसंत नव्हते आणि त्यात रामाने आपल्या मुलीला पुन्हा ह्या वनवासाच्या संकटात टाकावे ह्या गोष्टीचा रावणाला भयंकर क्रोध आला.स्वतःचा बाप लंकेचा सर्वाधिपती असतांना आपल्या मुलीने जंगलात कंदमुळे खात दिवस कंठावेत हे मानायला त्याचे मन तयार होईना.

आपल्या मुलीला काहीही करून लंकेला घेऊन यायचे रावणाने ठरविले.

रावणाने मामा मारीचाला यासाठी तयार केले.त्यांनी दोघांनी जंगलातील राम-सीतेची कुटी शोधून काढली. त्यांना हवी ती संधी मिळेना.रामाचा भाऊ लक्ष्मण दिवसभर सीतेचे रक्षण करत बाहेर बसलेला त्यांना दिसायचा.

रावणाला एक युक्ती सुचली.त्याने मारीचाला हरणाचा आवाज काढण्यास सांगितले आणि लक्ष्मणाला दूरपर्यंत येण्यास भाग पाडण्यास सांगितले.मारीचाने तेच केले. सीतेने महत्प्रयासाने लक्ष्मणाला हरणास पकडण्यासाठी तयार केले.

लक्ष्मण हरणास पकडण्यासाठी गेला आणि आपल्या प्रिय मुलीला घेऊन जाण्यासाठी गोसाव्याचे रूप घेऊन रावण हातात भिक्षापात्र घेऊन सीतेसमोर उभा राहिला.

पुढचे 'रावणायन' सर्वांनाच माहीत आहे.

धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या