पवनपुत्राचा आदेश
#####पवनपुत्राचा आदेश****
गांव वेशीवरच्या मंदीरी
उभा पवनपुत्र चिंतेत.
एका दगडी दिव्यामध्ये
अखंड जळते तेलवात.
डाव्या हातावर द्रोणागिरी
उजव्यात शोभते गदा.
गळ्यात माळ रुई फुलांची
रामनाम त्याच्या मुखी सदा.
कोणी ठेवतो,उडीद काळे
कोणी लावतो,मुखास गुळ.
डुलत येतो कुणी गांवकरी
पुढ्यात फोडतो नारळ.
आला वार्षिक सप्ताह जवळी
यंदा बंदच,किर्तन आणि प्रवचन.
सांगे मारुती सकळ भक्तांना
घरीच करावे पारायण.
भारी धुमाकूळ या करोनाचा
बसुच नका रे संगतीन.
बसा घरीच निवांत सगळे
सांगे बजाउन हनुमान.
होईल नायनाट या महामारीचा
करा मनन,चिंतन आणि ध्यान.
आले संकट जरी प्रथवीवरी
नेईल तारुन ,श्री रघुनंदन..........उदय क्षीरसागर.
जाम्ब समर्थ, तीर्थ महात्म्य.
जाम्ब समर्थ गावांत घडलेली, समर्थांच्या बाल वयातील ही घटना आहे. समर्थांची, म्हणजे नारायण सूर्याजीपंत ठोसरांची वृत्ती पहिल्या पासून वेगळी होती, लहानगे नारायण प्रथम पिताश्रींकडे व नंतर थोरले बंधू गंगाधरपंतांकडे, "मला अध्यात्म.. सायोज्यता शिकवा" अशी मागणी करीत असत. सूर्याजीपंताना आपला पुत्र, नारायण हनुमंताचा अवतार आहे हे ठाऊक होते. या कारणाने बंधू व पिता नारायणाला सांगत, " काही काळा नंतर शिकवू...आत्ता नाही"
हेच उत्तर रोज ऐकून, नारायण रुसला... घरातून बाहेर पडला. वेशीवरच्या मारुतीच्या मंदिराच्या गाभार्यातील काळोख्या कोपर्यात लहानगा नारायण आपल्या जिवलगाला म्हणजे प्रत्यक्ष मारूतीलाच, "मला शिकव..ज्ञान दे" असा आग्रह वजा हट्ट करू लागला.
घरात, मित्रांकडे हरवलेल्या नारायणाचा शोध घेतला गेला. बंधू गंगाधरपंत, (ज्याना सगळे जण 'श्रेष्ठ' म्हणत असत) ते म्हणाले, "नारायणास शोधू नका. तो त्याच्या मनीचे काम पूर्ण झाल्यावरच परतेल"
तिकडे मारुती मंदिराच्या गाभार्यात नारायणाचा बाल हट्ट सुरूच होता. हनुमंत आपल्याच स्वरुपाची परीक्षा घेत होते. तीन दिवस-रात्री अन्नपाण्या शिवाय लहानगा नारायण विनवण्या करीत होता. मध्यरात्र उलटली होती... नारायण एकटक हनुमंताकडे पाहात होता... हनुमंताच्या मूर्तीचा हात उंचावला, त्या हाताने गाभार्याच्या दुसर्या कोपर्याकडे बोट दाखवले.
त्या कोपर्यातून सुमधुर शब्द उमटले,
"नारायणा तुला ज्ञान देण्या साठी, मी आलो आहे. इकडे ये"
बालके नारायणाने वळून बघीतले. श्रीराम आपल्या दैवी स्वरूपात , स्मित हास्य करीत उभे होते. नारायण त्वरेने श्रीरामाना लोटांगण घालता झाला. श्रीरामानी नारायणाला(समर्थाना) उभे केले. दोघेही म्हणजे *राम आणि दास* एकमेकाकडे डोळ्यात डोळा घालून पाहू लागले.... या हृदयीचे परम-ज्ञान त्या हृदयी एका क्षणात गेले. ते तेथे स्थिरावले. लहानगा नारायण "ज्ञानसमर्थ" झाला होता.
जय जय रघुवीर समर्थ ! !
Comments
Post a Comment