रामायणसंस्कृत महाकाव्य

रामायणात वर्णिलेले लंकेचे महायुद्ध (चित्रनिर्मिती: इ.स. १६४९-५३)

रामायण हे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ समजतात व मानतात.[१]संशोधनानुसार रामायणाचा रचनाकाळ इ.स.पू. ५०२२ ते इ.स.पू ५०४० यादरम्यान निर्धारित केला गेला आहे. या संदर्भात उपक्रमावर झालेली ही [१] चर्चा वाचावी. रामाचे राज्य हे आदर्श राज्य होते असे मानले जाते.

रामायणामध्ये २४,००० श्लोक असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत.[२] रामायणाची मुख्य कथा अयोध्येचाराजपुत्र रामाची पत्‍नी सीतेचे रावणाकडून अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. ग्रंथानुसार वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाच्या मुलांनी (लव-कुश) प्रचार केला.[३]

नंतरच्या काळातील संस्कृत काव्यांच्या छंद रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. रामसीतालक्ष्मणभरतहनुमान व कथेचा खलनायक रावणआदी पात्रे भारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो. प्रभावित कृतींमध्ये इ.स.च्या १६व्या शतकातील मराठी संत एकनाथहिंदी भाषा कवी तुलसीदास, इ.स.च्या १३व्या शतकातील तामिळ कवी कंब,[४] इ.स.च्या २०व्या शतकातील मराठी कवी गजानन दिगंबर माडगूळकर आदी प्रमुख होत.

रामायणाचा प्रभाव आठव्या शतकापासून भारतीय वसाहत असलेल्या आग्नेय आशियामधील इंडोनेशिया (जावा, सुमात्रा व बोर्नियो) थायलंडकंबोडियामलेशियाव्हिएतनाम व लाओस आदी देशांच्या साहित्य, शिल्पकलानाटक या माध्यमांवरही पडलेला आढळतो.[५][६]

रामायणातील कांडेसंपादन करा

रामायणाच्या अनेक ठिकाणी पूर्ण व अपूर्ण अशी अनेक हस्तलिखिते सापडली आहेत. यांतील सर्वात जुने हस्तलिखित ११व्या शतकातील आहे.[७] वाल्मीकी रामायणाच्या प्रतींच्या उत्तर भारत व दक्षिण भारतप्रदेशातील अनेक प्रादेशिक आवृत्त्या मिळाल्या आहेत. रामाचे जन्मापासून ते अवतारसमाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे सात कांडांत(प्रकरणांत) विभागले आहे.[८]

शैलीमधील फरकांमुळे प्रथम व अंतिम कांड ही मूळ रामायणात नसल्याचा संदेह संशोधकांना आहे.[१०]

रामायणातील पात्रे, वगैरेसंपादन करा

कथासारसंपादन करा

पूर्ण लिहा

रामायणातील नीतिपाठसंपादन करा

वाल्मीकी ऋषींनी त्यांच्या रामायणात रामाच्या रूपाने आदर्श जीवन कसे असावे याचा नीतिपाठ प्रस्तुत केला आहे. मानवी जीवन क्षणभंगुर असून भोगलालसेचा त्याग करून रामाप्रमाणे आदर्श जीवन व्यतीत करावे, यातच मानवाचे कल्याण आहे असा वाल्मीकी रामायणचा अभिप्राय आहे.[११]

नारदमुनी हे संक्षेप रामायण या वाल्मिकी रामायणातील सर्गात आदर्श मनुष्याच्या १६ गुणांचे वर्णन करतात. हे सोळा गुण येणेप्रमाणे - 
१. गुणवान - नीतिवंत 
२. वीर्यवान- शूर 
३. धर्मज्ञ - धर्माचा जाणकार 
४. कृतज्ञ ,
५. सत्यवाक्य – सत्यवचनी 
६. दृढवृत्त – आत्मविश्वासी,
७. चरित्र्यवान – चारित्र्य चांगले असणारा, 
८. सर्वभूतहित – सर्व जीवांचे हित बघणारा
९. विद्वान 
१०. समर्थ 
११. सदैक प्रियदर्शन – ज्याचे दर्शन सदा सुखकर आहे असा
१२. आत्मवंत – धैर्यस्थ, 
१३. जितक्रोध –क्रोध जिंकलेला , 
१४. द्युतिमान् – कांती सुंदर असलेला , 
१५. अनसूयक – असूया नसलेला, 
१६. कस्य बिभ्यति देवाश्च जातरोशस्य संयुगे' - ज्याच्या कोपास देवताही घाबरतात असा. 

रामायणातील राम स्वतःस मनुष्यच म्हणवितो. (आत्मानं मानुषं मन्ये) पुढील काळात रामाचे दैवतीकरण होऊन तो विष्णूचा अवतार गणला जाऊ लागला.

रामायणाचा काळसंपादन करा

परंपरेने या महाकाव्याची घटना हिंदू कालगणनेच्या तिसऱ्या युगात - त्रेतायुगात (सत्ययुगात) घडली. रचयिते वाल्मीकी हे सुद्धा या महाकाव्यातील एक सक्रिय पात्र होते.

रामायणाची भाषा पाणिनीय काळापेक्षाही जुनी संस्कृत भाषा आहे. महाभारत व रामायण यांच्या संस्कृतमध्ये फरक दिसतात. रामायणाच्या मूळ कृतीची रचना इ.पू. पाचव्या शतकात सुरू झाली व अनेक शतके चालली. मूळ स्वरूपात अनेक फेरफार होऊन रामायणाचे सध्याचे स्वरूप तयार झाले. रचनाकालाच्या अभ्यासासाठी भाषेचे स्वरूप हा पायाभूत आधार आहे.

रामायणाच्या कथेचा काळ याहून पुरातन असू शकतो. रामायणाची पात्रांची नावे - रामसीतादशरथजनकवसिष्ठविश्वामित्र हे वाल्मीकी रामायणापूर्वीच्या ब्राह्मणग्रंथांत व वेदांत आढळतात.[१२][१३] रामायणाची मुख्य पात्रे वहिसुव(?), ब्रह्मा, विष्णु वा वेदोक्त देवता नाहीत. महाभारत-रामायणांच्या रचनेनंतर या देवता लोकप्रिय झाल्या.

सामान्यपणे, रामायणाचे दुसरे कांड ते सहावे कांड हे भाग या महाकाव्याचे प्राचीनतम भाग मानले जातात. पहिले बालकांड व शेवटचे उत्तरकांड नंतर मूळ प्रतीस जोडले आहे.[१४] बालकांड व अयोध्याकांड यांतील घटना गंगेच्या खोऱ्यातील प्रदेशाची व प्राचीन भारतातील १६ जनपदांची (मगध व कोसल प्रदेश) परिचिती दाखवतात. या भागांचे राजकीय व भौगोलिक वर्णन रामायणात आहे.

रामायणाच्या अरण्यकांडात राक्षस, विचित्र प्राणी आदींचे काल्पनिक वर्णन आढळते. इतिहासकार एच.डी. सांकलिया यांनी रामायणाचा काळ सुमारे इ.पू. चौथ्या शतकातला असल्याचे प्रतिपादले आहे.[१५] तर इतिहासकार ए.एल. भाषम हे रामकाळ इ.पू. ७व्या वा ८व्या शतकाचा असल्याचे मानतात.[१६]

रामायणाची कथा सहा हजार वर्षे जुनी असू शकते.[१७]

’रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ (प्रकाशक - पुष्पक प्रकाशन, २०१५) या प्रफुल्ल मेंडकी यांनी लिहिलेल्या पुस्तकात रामायणातील वेगवेगळ्या घटना किती वर्षांपूर्वी घडल्या ते निश्चित करण्याचा प्रयत्‍न केला आहे.

विभिन्न भाषांतरे/रूपांतरेसंपादन करा

रामायणाच्या कथेचा आशियाच्या अनेक संस्कृतींमध्ये प्रसार झाला आहे. रावण आणि त्याची बहीण, जावा बेटावरच्या एका नृत्यात

अनेक जानपद कथांमध्ये रामायणाच्या कथेचे विविध रूपांतरे दिसतात. उत्तर भारतातील रामायणकथा दक्षिण भारतातील व आग्नेय आशियामधील प्रचलित रूपांतरांपेक्षा भिन्न आहेत. रामायणाचा कथासंप्रदाय थायलंडकंबोडियामलेशियालाओसव्हिएतनाम व इंडोनेशिया देशांमध्ये प्रचलित आहे.

मलेशियातील काही रूपांतरांत लक्ष्मणास रामापेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. या रूपांतरांत राम दुय्यम व दुर्बल भूमिकेत आहे.

वाल्मीकी रामायणात रामचरित्राचे वर्णन आहे, तर वाल्मीकी यांनीच लिहिलेल्या अद्भुत रामायणात सीतेच्या चरित्र कथनाला प्राधान्य दिले आहे.

लाओसमध्ये रामायणाचे फ्रा लाक फ्रा राम या नावाने रूपांतर केले गेले.

संदर्भ व नोंदीसंपादन करा

१. श्री अद्भुत रामायण, संपादन- विष्णुशास्त्री बापट

भारतीय रूपांतरेसंपादन करा

भारतात विविध काळांत लिहिलेली रामायणे परस्परांपासून भिन्न आहेत. १८व्या शतकात मराठी भाषेत श्रीधरपंतांनी रामायण रचले. १४-१५व्या शतकात कुमार वाल्मीकी यांनी कानडीत तोरवे रामायण नावाने रूपांतर केले. कानडीतकुवेंपु यांनी श्री रामायण दर्शनम्‌ व रंगनाथ शर्मा यांनी "कन्नड वाल्मीकि रामायण" नावाची रामायणे लिहिली.

१२व्या शतकातील तमिळ कवी कंब यांनी "रामावतारम्" अथवा कंबरामायण ग्रंथ रचिला. संत एकनाथांनी "भावार्थ रामायण" हा काव्यग्रंथ मराठी भाषेत लिहिला. हिंदी भाषाभाषेचे प्रसिद्ध रामायण १५७६ सालात तुलसीदास यांनी श्री रामचरित मानस नावाने रचले. रामायणाच्या रूपांतरित आवृत्त्या गुजराती कवी प्रेमानंद यांनी १७व्या शतकात, बंगाली कवी कृत्तिवास यांनी १४व्या शतकात, उडिया कवी बलरामदास यांनी १६व्या शतकात, तेलुगू कवी रंगनाथ यांनी लिहिल्या..

रामायणाच्या काही उप-रूपांतरांत रावण अहिरावण - महिरावण रूपात येतो.

केरळच्या "मापिळ्ळे रामायण" या रामायण रूपात रामायण लोकगीतांमध्ये गुंफण्यात आले आहे. [१८]

रामायणाची मुसलमान प्रत सुद्धा आहे. या रूपांतरात रामायणाचा नायक एक मुस्लिम सुलतान आहे. रामाचे नाव यात "लामन" असे बदलले आहे; इतर पात्रे रामायणाप्रमाणेच आहेत.

हंपी येथे विजयनगर साम्राज्याचे अवशेष आहेत. तेथे सुग्रीवन गुहे (सुग्रीवाची गुहा) नावाची गुहा आहे. हे स्थळ सुंदरकांडातील किष्किंधेय वर्णनातील स्थळ असल्याचे मानण्यात येते. या ठिकाणी सुप्रसिद्ध हजारी राम मंदिर आहे.

आग्नेय आशियातील रूपांतरेसंपादन करा

आग्नेय आशियातील रामायणाचे चित्र

आशियाच्या अनेक संस्कृतींवर रामायणाचा प्रभाव पडला आहे. काही देशांच्या राष्ट्रीय महाकाव्यांसाठी रामायण प्रेरणास्थान आहे. चीनचे महाकाव्य "पश्चिमदत्त पयण" याचे काही भाग रामायणावर आधारित आहेत. या महाकाव्याचे "सुन् वुकांग्" पात्र हनुमानाच्या पात्रावर आधारित आहे. इंडोनेशियाच्या जावा प्रदेशातील सुमारे नवव्या शतकातील रूपांतर "काकाविन् रामायण" नावाने ओळखले जाते.यात संस्कृत रामायणाच्या तुलनेत अनेक ठिकाणी भेद आहे. लाओस देशाचे काव्य "फ्रा लक फ्रा लाम" हे सुद्धा रामायणाचे रूपांतर; या नावातील "लक" आणि "लाम" नावे म्हणजे लक्ष्मण व रामाच्या नावांचे लाओ रूपांतर. यात रामाचे जीवन बुद्धाचा पूर्वावतार म्हणून चित्रित केले आहे. मलेशियाच्या "हिकायत्‌ सेरि राम" काव्यात रावणासब्रह्माच्या वराऐवजी अल्लाचा वर प्राप्त झाल्याचे दाखविले आहे.[१९]

थायलंडचे काव्य "रामकियेन" रामायणावर आधारित आहे. यात सीता ही रावण व मंदोदरी यांची कन्या असल्याचे दाखविले आहे. ज्योतिषी विभीषण जेव्हा सीतेची कुंडली पाहून जेव्हा अपशकुन वर्तवितो तेव्हा रावण तिला पाण्यात फेकून देतो, नंतर ती जनकास प्राप्त होते. थाई रामायणात मारुती हे महत्त्वाचे पात्र आहे. काव्याची कथा बॅंकॉकनजीकच्या "वात फ्रा कयेव" देवस्थानाजवळ घडल्याचे सांगितले आहे.

इतर आग्नेय आशियाई रूपांतरांत बालीचे "रामकवच", फिलिपाईन्सचे "मरडीय लावण", कंबोडियाचे "रीम्कर" आणि म्यानमारचे "याम जात्दव" प्रमुख होत.

वर्तमानात रामायणसंपादन करा

राम रावण युद्ध

कानडीतील कुवेंपु यांचे रामायण रामायण दर्शनम व तेलुगूकवी विश्वनाथ सत्यनारायण यांच्या रामायण कल्पवृक्षमु या कृतींस ज्ञानपीठ पुरस्कार लाभले आहेत. अशोक बॅंकर यांनीइंग्लिश भाषेत रामायणाधारित सहा मालिका कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

कांचीपुरमच्या गेइटी रेल्वे थिएटर कंपनीने द्राविडस्वाभिमानाची पुनःस्थापना या उद्देशाखाली या महाकाव्याची पुनर्रचना केली. यात रावण विद्वान, राजनीतिज्ञ, सीता त्याची धर्मपत्‍नी, राम हा एकएक नीतिनियम धाब्यावर टाकणारा लंपट राजकुमार असे दाखविले आहे. रामायणाची ही आवृत्ती पारंपरिक आवृत्तीच्या उलटी असून ती लिहून द्राविड चळवळीस बळ देण्याचा प्रयत्‍न केला गेला.

जैन /पंप रामायणसंपादन करा

रामचंद्र चरित पुराण अर्थात पंप रामायण हे कन्नडसाहित्यप्रकारात येते. जैन परंपरेनुसार लिहिल्या गेलेल्या पंप रामायणाचा कर्ता आहे- नागचंद्र. अभिनव पंप असेही नामाभिधान असलेले हे चम्पू काव्य आहे.चम्पू काव्यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन्ही पद्धतीने विषय मांडलेला असतो. भावनात्मक विषय पद्यात आणि वर्णनात्मक विषय गद्यात अशी याची रचना असते.याचे कन्नड नाव रामचंद्र-चरिते पुराण असे नाव आहे.

उत्तर भारतातील घराघरांत तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सर्वज्ञात आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच सीमित राहिले.

या रामायणाचा कर्ता नागचंद्र याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक  व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते.

कथेचा सारांश-

मिथीलेचा अधिपती महाराज जनकाची पत्‍नी गर्भवती राहिली. पूर्वजन्मीच्या वैमनस्यातून एक निशाचर त्या गर्भालानष्ट करण्याची वाट पहात होता. राणीने जुळ्या बालकांना जन्म दिला. या बालकांपैकी मुलाचे अपहरण निशाचराने केले. आकाशमार्गाने जात असता पूर्वजन्मीच्या तपस्येचे स्मरण होऊन निशाचराने त्या बालकाला कोणतीही इजा न करता, अलगदपणे पृथ्वीवर उतरविले. ते बालक हळूहळू पुढे जात रथनुपूर चक्रवालपूरचे महाराज इंदुगती यांना मिळाले. आनंदलेल्या राजाने त्या बाळाचे नाव प्रभामंडल ठेवले. जनकाने ज्योतिषांकडून  आपले दुसरे बालक सुखरूप आहे असे समजून घेतल्यावर कन्येचे नामकरण केले वा तिचे नाव सीता ठेवले. सौंदर्यवती सीता मोठी होऊन शास्त्रादी कलांमध्ये निपुण झाली. (वाल्मिकी रामायणात राजा जनकाला सीता ही शेतामध्ये नांगराच्या फाळाशी सापडली अशी कथा आहे.)

अनेक किरातांकडून होणाऱ्या त्रासामुळे पृथ्वीवर अनाचार माजू लागला. या संकटातून सोडविण्यासाठी मदत करायला जनकाने राजा दशरथाला विनंती केली. त्यावेळी तरुण, अत्यंत पराक्रमी असे दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण यांनी त्या किरातांचा पराभव केला. या पराक्रमाने आनंदित झालेल्या जनकाने सीतेचा विवाह रामाशी करण्याचे ठरविले. ही बातमी समजताच नारद उत्सुकतेने पहायला गेले व स्वतःच मोहित झाले. त्यांनी सीतेचे एक चित्र तयार केले व मणिमंडपात ठेवले. प्रभामंडलाने (निशाचराने नेलेला तिचा जुळा भाऊ) सीतेचे ते चित्र पाहिले व त्याने आपल्या वडिलांना तिला मागणी घालायला सांगितले. जनक राजाने हा प्रस्ताव नाकारला. सीतेचा विवाह रामाशी करायचा असल्याचे जनक राजाने सांगितल्यावर इंदुगती राजा चिडला, त्याने त्याच्या कुलातील वज्रावर्त धनुष्यावर प्रत्यंचा चढवून दाखविण्याचे सामर्थ्य रामात असेल तरच सीतेचा विवाह रामाशी करावा असा युक्तिवाद केला. रामाच्या पराक्रमावर विश्वास असलेल्या जनकाने स्वयंवर योजले. देशोदेशीचे राजे हरले, पण रामाने मात्र हे आव्हान पेलले व सीतेने रामाला वरमाला घातली. सागरावर्त नावाच्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून लक्ष्मणानेही आपला पराक्रम सिद्ध केला. त्यामुळे चंद्रध्वज राजाने आपल्या अठरा कन्यांचे विवाह लक्ष्मणाशी करून दिले. (वाल्मिकी रामायणात लक्ष्मणाची पत्‍नी म्हणून ऊर्मिला हिचाच उल्लेख सापडतो.)

या पराक्रमामुळे प्रभामंडलाच्या मनात रामाविषयी ईर्ष्या व मत्सर निर्माण झाला. रामावर आक्रमण करण्यासाठी प्रभामंडल निघाला त्यावेळी आपल्या जन्माचे रहस्य समजल्यावर त्याला मूर्च्छा आली. शुद्धीवर आल्यावर त्याला शोक झाला कारण त्याने आपल्या बहिणीचाच लोभ धरला हे त्याला समजले होते. त्यानंतर प्रभामंडलावर राज्य सोपवून राजा इंदुगतीने जैन धर्माची दीक्षा घेतली. सीतेसह अयोध्येस येताना राजा दशरथाने संपूर्ण परिवारासहित भूतहितरत भट्टारकांचे दर्शन घेतले. अयोध्येस आल्यावर दशरथाने रामाला राज्यभार स्वीकारण्यास सांगितले. भरताने विरक्त होऊन वडिलांसह तपस्येसाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. ते ऐकून कैकेयी दु:खी  झाली वा तिने दशरथाकडे भरतासाठी चौदा वर्षांपर्यंत राज्यभार मागितला. हे ऐकून सर्वजण व्यथित झाले, परंतु रामाने चौदा वर्षे दिग्विजयासाठी बाहेर पडण्याचे जाहीर केले. सीता वा लक्ष्मणही रामासह निघाले. प्रयाणाला निघताना राम-सीता –लक्ष्मणाने रत्‍नभवनात जाऊन जिनदेवांचे आशीर्वाद घेतले. विविध नगरांमधून प्रवास करीत असताना राम-लक्ष्मणांनी वाटेवर आड आलेल्या शत्रूंचा नाश केला. विनयाने सामोरे आलेल्या राजांची मैत्री स्वीकारली.या राजांना त्यांची मदत झाली त्यांनी राम व लक्ष्मण यांच्याशी आपापल्या कन्यांचे विवाह करून दिले. (वाल्मिकी रामायणात श्रीराम हा एकपत्‍नी आदर्श पती म्हणून मान्यता पावला आहे.)  कर्णध्वज नावाच्या सरोवराकाठी शांतीच्या अपेक्षेने अणुव्रत स्वीकारलेल्या एका गिधाडाला सीतेने आपला पुत्र मानले- हा जटायू! दंडकारण्यात रहात असताना एक प्रसंग घडला- रावणाची बहीण चंद्रनखी  हिचा मुलगा अरण्यात तप करीत होता.अनवधानाने राम-लक्ष्मणाकडून त्याची हत्या झाली. ते ऐकून खर व दूषण रामावर चालून गेले. सीतेला एकटी सोडून जाण्यापेक्षा लक्ष्मणाने युद्ध करावे व गरज भासल्यास लक्ष्मण रामाला बोलावून घेईल असे ठरले. युद्धभूमीवर लक्ष्मण पराक्रम गाजवीत असताना रावणाने एका शक्तिदेवतेला वश केले. लक्ष्मणाच्या मदतीसाठी रामाला खोटी हाक त्या देवतेने मारली व ती ऐकून, सीतेला एकटे सोडून राम युद्धासाठी आला. त्यानंतर राम-लक्ष्मणांच्या लक्षात आले की कोणी मायावी शक्तीने हा कट रचला होता. परंतु तोपर्यंत रावणाने सीतेचे हरण केले होते. जटायूकडून त्यांना ही बातमी समजली. सुग्रीव, जांबुवंत, हनुमान यांच्या भेटीनंतर शोकाकुल राम-लक्ष्मणांनी रावणाचे पारिपत्य करण्याचे ठरविले. त्यापूर्वी हनुमानाने लंकेत जाऊन सीतेची भेट घेतली व स्व-पराक्रमाने लंकेची नासधूस केली. ते सारे पाहून रावण अतिशय रागावला. नभोगमन – विद्या बलाने राम-लक्ष्मणासह सर्व सैन्य आकाशमार्गे लंकेच्या रणभूमीवर येऊन पोहोचले. युद्धात लक्ष्मणाने वीरश्री गाजविली. रावणाने फेकलेल्या सुदर्शन चक्रानेच रावणाचा नाश करण्याची आज्ञा रामाने लक्ष्मणाला केली व त्यानुसार  लक्ष्मणाने रावणाचा वध केला! ( वाल्मीकी रामायणात श्रीरामानेच दशानन रावणाचा वध केला आहे.)

रावणाच्या निधनानंतर त्याची पत्नी मंदोदरी हिने ४८,००० विद्याधर स्त्रिया व आपल्या कुटुंबासह जिनव्रताची दीक्षाघेतली. सीतेसह अयोध्येला सुखरूप परत आल्यावर राम-लक्ष्मणांनी ज्या ज्या कन्यांचे पाणिग्रहण केले होते त्यांनाही अयोध्येला बोलावून घेतले.

एके रात्री सीतेला दोन स्वप्ने पडली. एका स्वप्नात  दिसले की दोन बाण तिच्या मुखात प्रवेश करीत आहेत व दुसऱ्या स्वप्नात ती पुष्पक विमानातून खाली पडली आहे. पहिले स्वप्न शुभसूचक असून सीतेला दोन पराक्रमी पुत्र होतील असा त्या अर्थ, पण दुसरे स्वप्न दु:खरूप ठरेल असे रामाने सीतेला सांगितले.

कालांतराने सीता गर्भवती राहिली. तिच्या मनात जिनपूजेची तीव्र इच्छा जोर धरू लागली. त्याचवेळी काही ग्रामीण लोक रामाकडे आले  व दुराचारी रावणाकडे राहिलेल्या सीतेचा रामाने स्वीकार केल्याबद्दल टीका करू लागले. याविषयी लक्ष्मणाने सीतेची बाजू घेतली व रामाने सीतात्याग करू नये असे रामाला सुचविले. पण रामाने आपला राजधर्म पाळायचे ठरविले. अयोध्येजवळ असलेल्या सम्मेद पर्वतापाशी असलेल्या जिनाल्यात सीतला पूजा करण्यासाठी न्यावे वा तेथेच सोडून द्यावे अशी आज्ञा रामाने दिली. अरण्यात पोहोचल्यावर सीतेला हे समजले व ती रडू लागली. पण जिनव्रती असल्याने परलोकप्राप्तीची साधना करण्याचे तिने ठरविले. याचवेळी जिनव्रती राजकुमार वज्रजंघ वनात शिकारीला आला.एकाकी सीतेचा वृतान्त समजल्यावर ते तिला आपल्या राज्यात घेऊन आला व तिला त्याने आपल्या बहिणीप्रमाणे सांभाळले. ( वाल्मिकी रामायणात  सीतात्यागानंतर  वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली असे कथानक आहे.) नवमास पूर्ण झाल्यावर सीतेने लव-कुशाना जन्म दिला. ते यथावकाश मोठे झाले; शास्त्र-कला पारंगत, पराक्रमी झाले. एकदा नारद, लव आणि कुशाला भेटले आणि राम-लक्ष्मण यांचा आदर्श घेऊन त्यांनी कीर्ति प्राप्त करावी असे ते त्यांना म्हणाले. नारदांकडून रामकथा ऐकल्यावर, आपल्या निरपराध मातेचा त्याग केलेल्या रामावर, लव आणि कुश यांनी ससैन्य हल्ला चढविला. त्यांच्या पराक्रमापुढे राम व लक्ष्मणही हतबल झाले. त्यावेळी नारदांनी लक्ष्मणाला सांगितले की सीतेवर झालेल्या अन्यायामुळे चिडून युद्धासाठी आलेले हे दोघे रामाचे पुत्र आहेत. हे ऐकून राम व लक्ष्मण आनंदित झाले. त्यांनी लव-कुशाचे प्रेमाने स्वागत केले. पुंडरीकपूरला जाऊन सुग्रीव सीतेला भेटला व तिला अयोध्येला घेऊन आला. आपण अकलंकित असल्याचा पुरावा म्हणून सीतेने अग्निपरीक्षाही दिली. रामाने तिला राजगृही येण्याची विनंती केली, पण ती नाकारून सीतेने विरागिनी होऊन तपस्या करण्याचे ठरविले. श्रीरामानेही सिद्धशैल शिखरावर जिनव्रताची कठोर तपश्चर्या केली व शाश्वत मुक्ती प्राप्त केली.

या रामायणावर जैन परंपरेचा प्रभाव असल्याने या रामायणातील सर्वच पात्रे ही जैन परंपरा पाळणारी आहेत, व ती त्याप्रमाणे आचरण करतात असे दिसून येते- हे या रामायणाचे वैशिष्टय!

अध्यात्म रामायणसंपादन करा

परमेश्वराच्या ठिकाणी भक्तिभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते.ब्रह्मांड पुराणाचा एक भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय झालेला दिसून येतो. यालाच अध्यात्मरामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असेही म्हणतात.या ग्रंथाची ७ कांडे आणि १५ सर्ग आहेत.

अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीचे ज्ञान. सर्व विश्वाला व्यापणारे अव्यक्त अविनाशी तत्त्व कोणते त्याचा विचार करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र. ईश्वरस्वरूपाची ओळख करून घेणे म्हणजे अध्यात्म. या ग्रंथात श्रीराम हे सर्व जगाचे आदिकारण आहेत आणि भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी रामावतार घेतला आहे अशी या रामकथेचा मुख्य आशय असल्याने तिला अध्यात्म रामायण असे नाव दिले आहे.

रामकथा-
प्रमाणातीत, माया-जीव-ईश्वर यांच्या पलीकडे असलेल्या, निर्मल, विषयरूप मलविवर्जित, आत्म्स्वरूपज्ञान हेच शरीर, वाणी वा मन यांना अगोचर अशा दक्षिणामूर्तींना नमस्कार करून या रामायणाची सुरुवात होते.
देवर्षी नारद एकदा ब्रह्मलोकात गेले असता त्यांनी ब्रह्मदेवाला विचारले- ‘कलियुगात अनेक चुकीच्या गोष्टींच्या अधीन झालेल्या नष्टबुद्धी लोकांना परलोकाची प्राप्ती कशी होईल यावर काही उपाय सांगा.’ त्यावर ‘रामाचे यथार्थ स्वरूप जाणून घेण्याच्या इच्छेने पार्वतीने केलेल्या विनंतीनुसार भगवान शंकरांनी सांगितलेले अध्यात्म रामायण या कलियुगातील लोकांचे रक्षण करील’ असे ब्रह्मदेवाने नारदांना सांगितले.
अध्यात्म रामायणाच्या कथानकात वाल्मिकी रामायणापेक्षा काही वेगळेपण आहे.-
१. वाल्मिकी रामायणाचे गायन राम-सीतेचे पुत्र लव-कुश यांनी केले आहे, तर अध्यात्म रामायण हे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले आहे.
२. रामजन्माचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे की रावण वा त्याचा भाऊ कुंभकर्ण यांनी देवांना त्रास दिला. मनुष्याच्या हातूनच रावणाचा वध होईल अशी ब्रह्मदेवाची योजना होती वा त्यासाठीच विष्णूने रामावतार घेतला.
३. विश्वामित्रांनी राम व लक्ष्मण यांना मिथिलेला नेले.जनक राजाने आपली कन्या सीता हिच्या स्वयंवराची योजना केली होती. भगवान शिवाचे धनुष्य जो कोणी उचलेल आणि त्याला प्रत्यंचा लावेल त्याला सीता माळ घालेल असा स्वयंवराचा पण होता. सीता स्वयंवराचे असे आख्यान अध्यात्म रामायणात नाही. रामाने जनकाच्या नगरीत जाऊन तेथे असलेले शिवधनुष्य सहज पेलले आणि जनकाने या पराक्रमी युवराजाला आपली कन्या सीता विवाहपूर्वक दिली. धनुष्य तुटलेले समजल्यावर भगवान परशुराम, मिथिलेहून अयोध्येच्या वाटेवर परत जाणाऱ्या दशरथ आदि सर्वांना रागाने सामोरे गेले. प्रथम रामाविषयी त्यांनी आपला क्रोध व्यक्त केला परंतु नंतर मात्र श्रीरामाचे स्व-रूप लक्षात येताच त्यांना शरण जाऊन त्यांची स्तुती केली.परशुराम म्हणाले- ‘मला तुझ्या भक्तांची संगती वा तुझ्या चरणी दृढ भक्ती सदा लाभो. जो हे तुझे स्तोत्र म्हणेल त्याला भक्ती, विज्ञान वा अंतःकाळी तुझे स्मरण लाभो.’

ज्याप्रमाणे सीता स्वयंवर आख्यान या रामायणात नाही त्याप्रमाणे प्रसिद्ध अशा लक्ष्मणरेषेचा उल्लेखही यामध्ये नाही. मारीचाने कांचनमृगाचे रूप घेऊन सीतेला मोहित केल्यावर श्रीराम त्याच्यामागे जातात, त्यावेळी श्रीरामांचा आवाज ऐकून सीता लक्ष्मणाला रामाच्या रक्षणासाठी जायला सांगते. त्यावेळी तिच्याच रक्षणाचा विचार करून लक्ष्मण जायला तयार होत नाही. सीतेच्या आग्रहाखातर तो जातो, पण जाण्यापूर्वी लक्ष्मण एक रेषा काढतो वा कोणीही आले तरी ही रेषा ओलांडू नकोस असेही बजावतो. अध्यात्म रामायणातील सीता लक्ष्मणाचा अपमान करून त्याचा धिक्कार करते आणि त्यामुळे काहीसा चिडलेला लक्ष्मण तिला तसेच सोडून रामाच्या मदतीला निघून जातो असा कथाभाग आहे.
या रामायणामध्ये श्रीरामांनी शबरीला भक्तीची आणि लक्ष्मणाला ज्ञानाची साधने सांगितली वनवासाहून परत आल्यानंतर हनुमानाला प्रत्यक्ष सीतेने रामाचे स्वरूप सांगितले, त्याला ‘रामहृदय’ असे म्हटले जाते. त्याचे पठन जो करतो त्याची पापातून मुक्ती होते असे त्याचे फलही सांगितले आहे. योगमाया सीता सांगते- “राम हा सच्चिदानंदरूप आहे. तो गुणरहित, सर्वप्रेरक, स्वयंप्रकाशी, पापरहित आहे. राम हा शोकरहित आहे. त्याच्या रूपात बदल होत नाही. तो सृष्टिरूप भासतो ते मायेमुळेच. उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारी आदिमाया मीच आहे आणि या रामायाणातील सर्व घटना मायारूपी सीतेनेच घडविल्या आहेत.”
. या रामायणात गंधर्वाने केलेली रामस्तुती वैशिष्टपूर्ण आहे.- रामाचा देह म्हणजे ब्रह्मांड. पाताळ हे त्याचे तळवे, आकाश ही त्याची नाभी, अग्नी हे त्याचे मुख, सूर्य हे डोळे, चंद्र हे मन, यम ह्या त्याच्या दाढा, नक्षत्रे त्याचे दात, दिवस वा रात्र म्हणजे त्याच्या डोळ्यांची उघडझाप असे म्हणून श्रीराम हे सर्वव्यापी तत्त्व आहे असे म्हटले आहे. या रामायणाच्या शेवटी भगवान शंकर म्हणतात-
अहं भवन्नाम गृणान्कृतार्थो वसामि काश्यामनिशं भवान्या |
मुमूर्षमाणस्य विमुक्तये S हं दिशामि मंत्रं तव रामनाम ||
मी (महादेव) तुझाच जप करीत काशीतच निवास करतो. मरणासन्न प्राण्याला मुक्तीसाठी तुझ्याच नावाचा उपदेश करतो.


Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या