देव आहे का? जेव्हा डायनासोरचा अंत झाला तेव्हा जगामध्ये पहिला माणूस आला की देव? कारण कलयुगामध्ये हे कोणालाच माहित नाही
प्रत्येक उत्क्रांतिशास्त्राचे उत्तर लिहिताना पुढे काय गदारोळ होणार ह्याची मला पूर्ण कल्पना असते 🤦🏽♀️. पण विज्ञानाचे वेड आणि लिहायची खोड स्वस्थ बसू देत नाही.
वरील तीन प्रश्नांची उत्तरे मानली तर खूप सोपी आहेत , मानली तर खूप कठीण. मी आधीच स्पष्ट करते की माझे विचार जरी विज्ञानवादी असले तरी श्रद्धा आणि आस्था ह्या भावनांचा मी पूर्ण आदर करते.
१. पहिला प्रश्न : देव आहे का ?
ह्याचं खरं तर उत्तर आहे , की तुम्ही मानलं तर देव आहे . नाही मानलं तर नाही. आदिम काळात निसर्गाचे विविध प्रकोप आणि अत्यन्त कठीण काळात जगत असताना आपल्या होमिनिडे परिवारातल्या प्राण्यांना, माणसांच्या पूर्वजांना , आपल्याहून निसर्गाच्या श्रेष्ठत्वाची जाणीव झाली , आणि त्यालाच त्यांनी देव असं मानलं.
यात देव ह्या संकल्पनेचा प्रवास मजेशीर पद्धतीने झाला आहे. कुठलीतरी एक आपल्याहून श्रेष्ठ शक्ती मानणे , ह्या जाणिवेला सुरुवात झाली ती मानवी मेंदूमध्ये . मात्र ही जाणीव व्हायला कारण होते मेंदूमधील कार्यकारण भाव ओळखू शकणारे , तर्क करणारे स्थान !
प्रमस्तिष्क अंग : the frontal lobe.
( Health News - Medical News Today )
म्हणजे , मानवी मेंदूमध्ये जिथून तर्क करण्याच्या शक्तीचा उगम झाला , त्याच मेंदूच्या भागातून ज्याला आपण मानसिक श्रद्धेची भावना मानतो , ती विकसित झाली आहे.
तर्क हा विज्ञानाचा पाया , आणि श्रद्धा हे देवाचे उगमस्थान. पण माणसासाठी ह्या दोन्ही गोष्टीच्या मुळाशी एकच तत्त्व होते : ते म्हणजे प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे ! निसर्गाला पाहून पडलेले एकाच पद्धतीचे प्रश्न माणसाने तर्क आणि विश्वास ह्या दोन्ही पद्धतीने सोडवले . मग हिंदू धर्मात वेदांमध्ये निसर्गाची श्रेष्ठ तत्वे इंद्र , अग्नी , मित्र , वरुण अशा दैवी रुपकांवर बेतण्यात आली. त्यातून आपल्याला जे जे सर्वोच्च , ते ते देव असा विचार मिळाला. पण खरंतर एक प्रकारे हा सुद्धा चिकित्सक लोकांनी निसर्गाची रहस्ये शोधण्याचा केलेला प्रयत्नच होता.
जसजसे मानव उत्क्रांत होत गेले , तसतसा प्रत्येक संस्कृती मध्ये ह्या मोठ्या शक्तीचा एक केंद्रित वस्तू म्हणून वापर केला गेला. त्यासाठी देवळे/उपासनेच्या जागा तयार केल्या गेल्या.
हिंदू धर्मात उपनिषदांसारख्या साहित्यातून सगुण साकार आणि निर्गुण निराकार असे ह्या श्रेष्ठ शक्तीचे प्रकार कल्पिण्यात आले. त्यामुळे खरंतर आपलं उत्तर पूर्वजांनी पूर्वीच देऊन ठेवलंय. ज्यांना सगुण भक्तीची उपासना करायची असते , त्यांच्यासाठी मूर्ती , स्तोत्रे , उपासना , पूजा ह्या सगळ्या गोष्टी त्या श्रेष्ठ शक्तीपर्यंत पोचायचे साधन आहे. ज्यांना ह्या शक्तीबद्दल कुतूहल आहे , अथवा चिकित्सा आहे त्यांच्यासाठी ती एक नैसर्गिक शक्ती अथवा ऊर्जा आहे : पावसाचे बरसणे , नद्यांचे वाहणे , वाऱ्याचे फिरणे अशा निर्गुण अस्तित्वांमधली , जिला ते देव म्हणणार नाहीत कदाचित , पण तिचे अस्तित्व मानतील. आणि दोन्ही प्रकारची माणसे अर्थातच बरोबर आहेत.
जे देव मानत नाहीत , त्यांच्यावर राग धरावा का ? अजिबात नाही ! कारण देव न मानणारी माणसे सुद्धा नीतिमूल्ये , माणुसकी , कर्मयोग अशा गोष्टींवर विश्वास ठेवतच असतात. आपली/माणसांची बुद्धिमत्ता त्यांच्यासाठी सगळ्या चिकित्सक प्रश्नांचे उत्तर असते , आणि त्यात काहीच चूक नाही. शेवटी सगळ्या जाणीवा आपल्याला मेंदूचा पूल पार करूनच जाणवतात आणि तर्क आणि श्रद्धेचे मेंदूतले स्थान एकच , तेव्हा विचार करणाऱ्या मेंदूला मानलं काय , किंवा मनाच्या जाणिवेला मानलं काय , एकच आहे !
२. जेव्हा डायनोसॉर चा अंत झाला , तेव्हा जगात पहिलं कोण आलं माणूस की देव ?
(🤔🤔🤔. कुठल्या शास्त्रात देव , डायनोसॉर , माणूस हे एकत्र उल्लेखिले आहेत ? )
कालमापन : विविध इरा , एपोक , कालखंड
आपली काळाला समजून घेण्याची मर्यादा आपल्याला फार फार तर ख्रिस्तपूर्व काही शतके घेउन जाते पण निसर्ग कितीतरी कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे. ज्या डायनोसॉर चा उल्लेख आपण वाचतो ते केवळ २२८ लाख ते २०५ लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. ९०-९५ लाख वर्षांपूर्वी त्यांचा अंतसुद्धा झाला.
सजीवसृष्टीच वय मात्र ३८० कोटी वर्षां इतकं आहे!
माणसाच्या उत्क्रांतीचा काळ ह्यात केवळ सहा लाख वर्षे इतकाच आहे. परंतु पृथ्वीच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे देणारी कितीतरी साधने आपल्याला सापडली आहेत , जी सजीवसृष्टीच्या प्राचीनतेचे पुरावे देतात.
देवाचा उत्क्रांतीचा काळ कोणता ? तर ह्याचं उत्तर असं द्यावं लागेल , की मानवाच्या जाणिवेवर देव ह्या संकल्पनेचे प्रतिबिंब उमटले , तेव्हापासून देव ह्या गोष्टीचे अस्तित्व आहे. त्याआधी कोणी देव म्हणो न म्हणो , पूजा करो न करो , निसर्गच अव्याहतपणे आपले अस्तित्व टिकवून होता.
३. कलियुगात हे कोणालाच माहीत नाही .
विज्ञानानुसार जी काळमापनाची साधने मानण्यात येतात , त्यात आपण आणि डायनोसॉर ह्यांच्यात काही लाख वर्षांचं अंतर आहे. तेव्हा आपल्या प्रजातीच्या पूर्वजांचेही खूप पूर्वीचे पूर्वज अस्तित्वात होते. त्यामुळे खरंतर ह्या प्रश्नाला काहीच उत्तर नाही.
पण ह्याचं तरीही उत्तर द्यायचंच असेल , तर ते देण्यासाठी आपल्याला थोडासा पुराणांचा आणि गृहितकांचा आधार घ्यावा लागेल. आपण असे गृहीत धरू , की
(१).कलियुग हे खरेखुरे काल मापनाचे साधन होते
(२). शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले निसर्गाचे वय आणि युगांचे उल्लेख एकाच एककात मोजता येतील .
(३). ते एकक म्हणजे एक सौर वर्ष असे धरू. (आपल्यासारखे ३६५ दिवसांचे वर्ष )
◆हिंदू धर्मात ब्रह्म वैवर्त पुराणात असं नमूद केलं आहे , की एक कलियुग म्हणजे ४,३२,००० (चार लाख बत्तीस हजार) सौर वर्षे. ही काळमापनाची पद्धत जर मानली , तर वरील चित्रातील साधारण Cenozoic era , आणि Late Miocene Epoch पासून कलियुग चालू आहे.
◆हीच पद्धत पुढे नेली तर असं म्हणता येणं शक्य आहे , की जीवाष्म शास्त्रज्ञ आणि पुराण ह्यांच्या कालमापन पद्धती जोडल्या तर 'कलियुगा'पूर्वी डायनोसॉर चे अस्तित्व नष्ट झाले.
◆पुराणातले एक महायुग (चारी युगे धरून) ४३,२०,००० = ४३ लाख २० हजार सौर वर्षांचे मानण्यात येते. त्यानुसार Eocene Epoch पासून एक महायुग चालू झाले. (अजूनही डायनोसॉर खूप मागे आहेत).
◆म्हणजे , पुराणानुसार ह्या महायुगापूर्वीचे महायुग जेव्हा चालू होते , तेव्हा त्या काळात डायनोसॉर अस्तित्वात होते. त्यामुळे सगळी गृहीतके लक्षात घेता बरोबर आहे , डायनोसॉर च्या काळात देव मानत होते की नाही हे अक्षरशः कोणालाच माहीत नाही. देव आधी आले का ? माणूस तेव्हा होता का ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जीवाष्मशास्त्राने तरी समधनकारकरित्या देऊन ठेवली आहेत.
अशा प्रकारे डायनोसॉर गेले , आपण राहिलो.(२०२० साल पाहता आपलाही रामराम होण्याची शक्यता दूर वाटत नाही😢) .
देव 'मानणारे' आणि उत्क्रांती चा अभ्यास करणारे हे लोक खरं तर एकमेकांच्या विरुद्ध अजिबात नाहीत. एकाच निसर्गाचा रुपकांतून उलगडलेला अर्थ , जाणिवेला उमगलेला आवाका म्हणजे देव ही संकल्पना आणि त्याच निसर्गाला बोरकरांच्या भाषेतील लावलेली शास्त्रकाट्याची कसोटी आणि गोळा केलेल्या पुराव्यातून निर्माण केलेले ज्ञान म्हणजे विज्ञान ! देऊळ बंद ह्या सिनेमात सांगितल्याप्रमाणे , विज्ञान हे जग कसं निर्माण झालं हे सांगतं , तर अध्यात्म हे जग का निर्माण झालं हे सांगतं. सजीवांच आणि आपल्या आयुष्याचं एकक असणारी पेशी आपण सूक्ष्म भिंगातून पाहू शकतो , पण ती पेशी का चालते , सजीव का निर्माण होतात , ह्याची उत्तरे आपण अध्यात्मात शोधू पाहतो.
माणसाचे अस्तित्व मान्य करायचे तर वैज्ञानिक सिद्धांत आणि पुरावे अमान्य करून चालणार नाही.
कारण , विज्ञान हे दैव - देवतांच्या विरुद्ध उभे ठाकलेले आव्हान नसून देवाची संकल्पना आणि विज्ञानचं ज्ञान ह्या मेंदूच्या एकाचभागातल्या , एकाच प्रकारच्या , निसर्गाला समजून घ्यायाच्या आदिम प्रेरणेच्या करामती आहेत !
चूक भूल माफ असावी. 🙏🏼
संदर्भ :
१. कालमापन : Era आणि epoch : छायाचित्र : http://knewans.com वरून साभार
२. आपले आणि डायनोसॉरचे अस्तित्व किती वेगळे आहे ? Could Humans and Dinosaurs Coexist? Here's the Science.
३. पुराणांचा उल्लेख :: संदर्भ : H.D. Dharm Chakravarty Swami Prakashanand Saraswati. Encyclopedia Of Authentic Hinduism The True History and the Religion of India : (51) The beginning of kaliyug. (3102 BC)
४. देवाचा जन्म : एकेश्वरवाद मानणाऱ्या धर्माच्या अनुषंगाने देव ह्या कल्पनेचा जन्म कसा झाला ? How Did God Get Started?
५. विज्ञान देवाला अमान्य का करत नाही ? Why Science Does Not Disprove God
६. श्रद्धेचे मेंदूतील स्थान : Belief and the brain's 'God spot'
या मधे तीन प्रश्ण दिसतात १ ) एक देव आहे कां २ ) डायनासोर नंतर माणूस कां ? ३ ) कलीयुगांत माहीत नाही . ...... उत्तर देण्याचा प्रयत्न करतो कोठे चुक असेल तर दाखवून उपकृत करावे
देव -- देव ही संकल्पना आहे . या सर्व निसर्गाला नियंत्रीत करतो , जो बी ( सिड ) मधुन अंकुर फुलवतो असे बरेच चमत्कार जे माणसाच्या बुध्दीत येत नाहीत त्याला काय म्हणावयाचे तर तो देव - त्याला कोणी साकार तर कोणी निराकार मधे पाहतात . संतांनी सांगीतले " भाव तोची देव " मनाला सकारात्मक ताकत मिळवी . कोणीतरी माझ्या सोबत आहे ही भावना जास्त बळ देते . एखादा साधा व्यक्ती देव नाही हे सिध्द करू शकतो परंतु विद्यवान सुध्दा सिध्द करू शकत नाही . जेसे उर्जा ( विज ) दिसत नाही पण उजेड देणे पंखा फिरविणे अशी कामे दिसतात . तसेच देवाच्या बाबतीत घडते .
डायनासोर नंतर माणूस -- पृथ्वीच्य थंड झाल्या नंतर प्रथम एक पेशीय प्राणी बनला त्या नंतर बहुपेशीय . त्यानंतर उत्क्रांती . या प्रत्येक उत्क्रांती मधे हजारो वर्षाचा काळ गेला . त्यानंतर मासा पाण्यांतच राहणारा नंतर उभयचर कासवासारखे जे जमीन व पाणी दोन्ही ठिकाणी राहणारे , त्यानंतर जमीनीवर सरपटणारे जसे साप , सरडा , पाली , त्यानंतर पक्षी जे जमीनीशी कोन करतात , त्याच्या जवळच्या काळात झाडे झुडपे गवत हे तयार झाले त्या नंतर सर्वात सुपर ( बुध्दीमान ) माणूस तयार केला , या मानवाला मात्र रिकाम्या डोक्याने म्हणजे बुध्दीवर कोणतेच संस्कार न करता पाठविले त्या मुळे त्याला निवड करण्याचा अधिकार मिळाला . माणूस , महामानव ( आदर्श ) , महात्मा , संत , बनणार कां खल , दूर्जन कां राक्षस याची निवड त्याला करण्यांचा पूर्ण अधिकार त्याला दिला . संस्कार नसलेले डोके म्हणजे मेंदू त्या मुळेच दिला . जनावरे व पक्षी शेवटपर्यत तेच राहतात . कुत्रा - कुत्राच राहतो , कावळा कावळाच राहतो . त्याला त्याचे वैरी , आजारी झाले तर कोणता झाडपाला हे उपजत ज्ञान असते तसे माणसाच्या पिलाचे नाही त्याला तीनच गोष्टी उपजत मिळतात व त्या सर्वांना आवडतात . आईच्या ह्रदयाचे ठोके त्यामुळे ह्रदम , पाण्यांत तरंगते त्या मुळे पाणी व जन्मताना त्रास त्या मुळे रडणे ..... विषय थोडा भरकटला हा कमी शिक्षणाचा परीणाम बरका --- तर डायनासोर नंतर माणूस .
कलियुग -- या युगांत माणसाला शांतता आहे कां ? प्रत्येक ठिकाणी स्पर्धा . विज्ञानामुळे भौतिक सुखाची रेलचेल त्यातूनच बाहेर पडणे आवघड झाले . आमचा काळ आताच्या मानानी चांगला असे वाटते . विद्यार्थी दशेत पास होणे इतकेच टक्केवारीत पॉइंट मोजत नसत , तरुणपणांत वडीलांनी सांगीतले या मुलीशी लग्न कर केल लग्न , इतक सुलभ व सुखकर आयुष्य होत . कलियुगांत देव अध्यात्म वेद पुराणे याचा अभ्यास करावयास वेळ कोठे आहे , बारा बारा तास किंवा त्यापेक्षा जास्त काम करतात पाहून वाईट वाटते आमच्या सारखे सेवानिवृत्त झाल्या नंतर पैशाचा उपभोग घेण्या साठी यांची तब्बेत चांगली राहील कां ? ही परीस्थिती पुढे पुढे वाढत जाणार हे झाले कलियुग प्रथमच इतक मोठ उत्तर लिहीत आहे . रामकृष्ण हरी .
देव आहे का?
उत्तर - नाही
जेव्हा डायनासोरचा अंत झाला तेव्हा जगामध्ये पहिला माणूस आला की देव?
माणूस कारण डायनासोरचा अंत Cretaceous पिरियड मध्ये म्हणजे 136 मिलियन वर्ष आधी झाला आणि पहिला मनुष्य quaternary पिरियड म्हणजे 1.5 मिलियन वर्ष आधी आला. आणि डार्विन आजोबा बरोबर असतील तर देव हि फक्त संकल्पना आहे.
Comments
Post a Comment