कृष्णाने कर्णाला त्याची खरी ओळख महाभारत युद्धाच्या आधी का सांगितली. तो ते त्या आधी पण सांगू शकला असता. यामागे त्याची कर्णबाबत सहानुभूती होती का?
मी कर्णाला आजही अर्जुनापेक्षा उजवा मानतो. अर्जुनापेक्षा कर्णाचे सामर्थ्य अधिक होते. तो अधिक पराक्रमी होता. अधर्माची साथ दिली गेल्याने त्याचे कर्तुत्व कमी झाले असे नव्हते. शेवटी तो देखील एक कुंतीपुत्रच होता. त्याचे मन देखील पांडवांप्रमाणेच निर्मळ होते. अनेकवेळा त्याने दुर्योधनाच्या दुष्कृत्यांना विरोध केला पण मित्राला नेहमी त्याच्या चांगल्या वाईट कामात साथ देण्याच्या दिलेल्या वाचनामुळे त्याला त्या दुष्कृत्यांमध्ये सहभाग घेणे भाग पडले. समोर होणार्या घटना चुकीच्या असून सुद्धा डोळे झाकून मित्राला त्या चुका करू देणे आणि त्यात नाईलाजास्तव का होईना सहभाग घेणे हीच काय ती कर्णाची चूक असेल.
महापराक्रमी कर्णाकडचे कवच आणि कुंडल जरी युद्धाआधी त्याच्याकडून कपटाने काढून घेतले असले तरी त्याच्यातला पराक्रम, साहस, शौर्य कोणालाही काढून घेता आले नसते. कर्ण युद्धभूमीवर उतरला असता युद्धात त्याने पांडव सेनेची त्रेधा तिरपीट केली असती. अनेक प्रमुख सेनानी त्याला आधीच घाबरून होते. भगवान श्रीकृष्ण हे जाणून होते. मला वाटतं अगदी महाभारत युद्ध चालू होण्याच्या नेमकं आधी कर्णाला त्याच्या खर्या ओळखीबद्दल सांगण्याच्या मागे भगवान श्रीकृष्णांनी दोन गोष्टींचा विचार केला असावा…
- कर्ण महापराक्रमी होता. त्याच्याकडून पांडव सेनेला फार नुकसान झाले असते. ह्या शिवाय अर्जुनाचा वध करण्याची प्रतिज्ञा त्याने घेतली होती. भावाचा खून त्याच्या मोठ्या भावाकडून झाला असता. कर्ण हे महापाप करायला निघाला होता. त्याला जर पांडव त्याचे भाऊ आहेत हे कळले तर त्याला तो करायला चाललेल्या पापाची त्याला जाणीव होईल आणि तो ह्या युद्धातून तो माघार घेईल. व कदाचित पांडवांचा मोठा भाऊ ह्या नात्याने त्यांना ह्या युद्धात मदत करेल असा श्री कृष्णांनी विचार केला असावा.
- कर्ण आयुष्यभर सुतपुत्र म्हणुन हिणवला गेला. त्याला सुतपुत्र असल्याची लाज कधी वाटली नाही पण सुतपुत्र असल्याने त्याच्या कर्तुत्वावर शंका घेतल्या गेल्या. त्याच्या गुणांना फक्त क्षत्रिय नसल्यामुळे कमी लेखले गेले ह्याची सल त्याच्या मनात कायम होती. आयुष्याच्या शेवटी का होईना त्याला त्याची खरी ओळख कळावी. आयुष्य तर सुतपुत्र म्हणुन गेले पण आयुष्याचा शेवट तरी सुतपुत्र असा न होता ज्येष्ठ पांडव असा व्हावा आणि ह्या गोष्टीचे समाधान त्याला लाभावे अशी ईच्छा भगवान श्री कृष्णांची असावी.
Comments
Post a Comment