रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा सीतेला स्पर्शदेखील केला नाही, तरीसुद्धा रामाने सितेवर संशय घेऊन अग्नीपरिक्षा घेतली, यात चूक कोणाची ?

रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा सीतेला स्पर्शदेखील केला नाही, तरीसुद्धा रामाने सितेवर संशय घेऊन अग्नीपरिक्षा घेतली, यात चूक कोणाची ?

या प्रश्नाचे उत्तर रावण आहे. चूक रावणाची आहे. त्यामागील कारणे बघा :

  1. रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा सीतेला स्पर्शदेखील केला नाही ? असा रावण महान आहे ! असा अनेक जणांचा विश्वास असतो.
    1. मुळात ह्या संस्कृतीत ‘पर नारी मातृवत्’ अशी धारा असते, मग ती स्त्री कोणीही असो. एखाद्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या परवानगी विना व पती विना तिचे हरण करणे हे महापाप व अनैतिक कृत्य आहे. आपण विचार करावा, की असा प्रसंग आपल्या कुटुंबासोबत घडला तर ? रामाच्या अनुपस्थितीत व सीतेच्या परवानगीशिवाय तिचे हरण करून रावण तिला लंका च काय वैकुंठाला जरी घेऊन गेला असता तरी रावण च येथे गुन्हेगार ठरला असता. परस्त्रीला परपुरुषाचा ज्ञात-अज्ञात स्पर्श सुद्धा तिचा विनयभंग ठरत असतो अजून तिचे हरण करणे ही दूरची बाब. यामुळे रावण सीतेचे हरण करून सुद्धा स्पर्श करीत नाही म्हणजे तो महान असा युक्तिवाद लावून रावणाचे उदात्तीकरण करणे चुकीचेच आहे. (नीतिशास्त्र)
  2. सीतेशी अति न करण्याचे कारण म्हणजे रावणाला मिळालेले श्राप!!! हे ही जाणायला हवे.
    1. रावणाला त्याच्या जीवनात अनेक श्राप मिळाले होते त्यापैकी पहिला श्राप त्याला त्याच्या मेव्हणीने दिला होता. रावणाची पत्नी मंदोदरी ची बहीण माया वैजयंतपूर नरेश शंभर ची पत्नी होती. रावण शंभर कडे गेला असतांना त्याची मायाशी भेट होते व तो तिला आपल्या शब्दांत फसवतो. आपल्या पत्नीवर रावणाची कुदृष्टी पाहून शंभर त्याला बंदिस्त बनवून घेतो. तितक्यात राजा दशरथ वैजयंतपूर वर चालून आल्यामुळे शंभर युद्धावर जातो व तेथेच त्याला वीरमरण येते. इथे रावण कारागृहातुन मोकळा होऊन पुन्हा माया ला जबरीने आपल्याशी विवाह करण्यास लावत असल्यामुळे माया स्वतःला अग्नी समर्पित करते पण रावणाला जाता जाता श्राप देते,“वासनांध रावण तू वासनेत अंध होऊन माझे सतित्व भंग केल्यामुळे माझ्या पतीचा युद्धात अंत झाला, त्याचप्रकारे तुझा ही हिच स्त्री वासना अंत चे कारण होईल. ” (संदर्भ १)
    2. रावणाला दुसरा श्राप : वेदमती नामक एक ऋषिकन्या वेदमती श्री विष्णू पती मिळावा म्हणूंन तपस्या करत असते. त्याचवेळी रावण पुष्पक विमानाने आकाश भ्रमण करतांना त्याची कुदृष्टी तपस्विनी वेदमती वर पडते व त्याच्या मनात पुन्हा वासना जागृत होते. तो तिला आपल्या सोबत येण्याचे आग्रह करतो पण ती काही त्याचे ऐकत नाही. रावणाला राग येतो व तिच्याशी जबर करायला लागतो. इतके पाहून वेदवती यज्ञात उडी घेते व जाता जाता त्याला श्राप देते की, “रावण पुढील जन्मात एकच स्त्रीच तुझ्याच मृत्यूचे कारण होईल व ती स्त्री मीच असेल.” रावणाल इथेही स्त्री प्राप्त होत नाही. (संदर्भ १)
    3. लंकापती रावण त्रैलोक्यावर विजय मिळविण्यासाठी जमीन आकाश पाताळ युद्ध करत असतो. रावण स्वर्गलोकात असताना त्याला अप्सरा रंभा दिसते. वासनिक रावण तिला वाईट स्पर्श करीत पकडतो. तेव्हा रंभा त्याला नाते व आपली सून असल्याचे सांगते पण तो काही ऐकेना. तेव्हा कुबेराचा मुलगा नलकुबेर हा रावणाला श्राप देतो की, “आजपासून रावण कोणत्याही स्त्रीला स्पर्श करेल त्याचवेळी तो छिन्न विन्न होईल.” (अप्सरा ह्या वेश्या नसतात तर व्यवसायी नर्तकी असतात) (संदर्भ १)
    4. ह्याचप्रमाणे रावणाला नंदी, राजा अरण्यक यांपासून देखील श्राप मिळालेला होता अन तितकेच काय तर स्वतःच्या बहिण शुल्पनखा कडून देखील श्राप लागलेला होता.असा हा रावण सीतेला स्पर्श करतांना पुन्हा पुन्हा त्याचे श्राप आठवत असेल अन म्हणूनच त्याने सीतेला स्पर्श करण्याऐवजी तिच्या मर्जी ची प्रतीक्षा करीत होता.
  3. स्वतःच्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी परस्त्री उचलणे
    1. हा कोणता न्याय झाला. स्वतःच्या बहिणीने आधी कोणते दिवे लावले याची विचारपूस न करता सरळ इतर विवाहित स्त्रीला हरण करणे हे कुठेही नैतिकतेच्या सीमेशी गाठत नाही. त्यामुळे हा देखील अपराधच होय.
  4. काही सांगतात की,“सीता रावणाची मुलगी होती म्हणूंन रावणाने तिला नेणे चुकीचे नव्हते”.
    1. कोणता पिता/वडील/बाप आपल्याला मुलीला जावईच्या व सासरच्या परवानगी विना माहेरी नेतो ? मातृसत्ताक समाजात ठीक आहे पण येथे पितृसत्ताक समाजव्यवस्था होती. लग्नानंतर मुलीचे घर म्हणजे तिच्या पतीचे घर असते. अश्या विवाहित मुलीला माहेरी आणून तिला स्वतःशी विवाह करायला लावणे हे अधर्म कृत्य आहे.

या सर्व कारणांमुळे रावणच पूर्णपणे चुकीचा आहे. त्याचा अहंकार, वासना, लालच, क्रोध हेच त्यांचे मूळ शत्रू होते. हेच त्याचे अंतचे कारण होते. समजा उद्या तुमच्या घरी तुम्ही घरी नसतांना विजय माल्या येतो. व घरातील स्त्रीला न विचारता तुम्हाला न कळवता उचलून घेऊन जातो. जरी तो घरातील स्त्रीला रोज विमानात बसवेन, महागड्या हॉटेलात नेईन, बीच, पार्ट्या वैगरे करेन, तर काय कराल तुम्ही “विजय माल्या चांगला आहे त्याने तिला स्पर्श ही केला नाही” असे सांगाल का ?

कोणत्याही “परस्त्रीचे संमती विना हरण करणे” हाच मोठा गुन्हा व महापाप आहे. बस्स पुढे तो तिला स्पर्श करो वा न करो; ते पुढील दुष्कृत्य.. कळतंय का तुम्हाला येथे सांगण्याचा उद्देश काय आहे…!!


(चित्र : राजा रविवर्मा आर्ट गॅलरी : सीता हरण वेळी जटायू चे पंख कापतांना.)


रामाने सीता वर संशय घेऊन अग्निपरीक्षा घेतली याचे उत्तर मी दोन पद्धतीने मांडत आहे.

  • रामायण एक मानवी दृष्टीने :
    • समजा राम अत्यंत सामान्य माणूस व रावण सुद्धा दहा तोंडी नसून सामान्य होता. संपूर्ण रामायण विना चमत्कारी शक्ती व सामान्य जनजीवन नुसार केले तर आपल्याला अनेक विसंगती सापडतील. सीता एक मनुष्य देहधारी सामान्य स्त्री जेव्हा अग्नीत जाते तेव्हा ती शुद्ध होऊन येईल की जळून येईल. सीता काही धातू वैगरे पदार्थांची नव्हती, होती तर एक भौतिक हाड मांसाची देहिक गोळा. मग त्यावेळस खरंच अशी धारणा असेल का, की अग्नीत मनुष्य शुद्ध होतो. नाही ! अग्नी काय सर्वांना समान आहे. जो कोणी येईल त्याला भस्मसात करेल. मग अश्या रामायणात सीतेला वेगळी परीक्षा द्यावी लागली असेल पण ती अग्नी प्रमाणे कठीण असल्यामुळे तिचे नाव ‘अग्निपरीक्षा’ देखील कदाचित झाले असेल, असा ही तर्क येथे उभा राहतो.
    • कोणी साधारण मनुष्य आपल्या पत्नीला अथवा कोणालाही आगीत जायची परवानगी देईल काय ? दिली जरी आणि आगीत गेले जरी तरी ती व्यक्ती जळालीच असेल. पण रामायणात कुठेही असा उल्लेख आढळत नाही की सीतेला अंगावर फोड आले होते अन की ती जळाली असेल.
  • रामायण एक दैविक दृष्टीने :
    • रामायणात अनेक जादुई चमत्कारिक अस्त्र शस्त्र वापरली गेली. या रामायणात रावणाला दहा तोंड तर उडणारे विमान वैगरे आहेत. अन येथे ही राम सीतेला अग्नी परीक्षा द्यायला लावतो. पण ह्या रामायणात एक वेगळी कथा आहे. ती बघा अशी की…
    • वनवासात असतांना पंचवटीत निवास असतांना लक्ष्मण फळ व कंद गोळा करण्यासाठी गेलेला असतो. त्यावेळेस अग्निदेव स्वतः येतात व रामाला विनंती करतात की,“हे दशरथ नंदन प्रभू राम ! आपण सीता मातेच्या सरंक्षणासाठी वनवास संपेपर्यंत माझ्या कडे ठेवावे व त्याजागी सीता मातेची एका छायाकृती आपणाकडे राहील.” राम हे स्वीकारतो व त्यावेळी मूळ सीता अग्नीदेवाकडे जाते व तिची प्रतिकृती रामाकडे असते. मुख्यतः ही बाब लक्ष्मणाला देखील माहीत नसते. (संदर्भ १)
    • तत्पश्चात रावण वधनांतर सीतेला अग्नी परीक्षा देतांना अग्निदेव मूळ सीतेला परत करतात व छाया प्रतिकृती आपल्याकडे घेतात. त्यावेळी अग्निदेव रामाला म्हणतात की, “हे श्री राम आपली पत्नी शुद्ध पत्रिव्रात्य असून राक्षसराज्यात देखील तिने आपलेच स्मरण केले आहे.” तेव्हा भगवान श्रीराम म्हणतात, “अवैमि चैनामनघेति किन्तु लोकापवादो बलवान्मतो मे । छाया हि भुमेः शशिनो मलत्वेनारोपिता शुद्धिमतः प्रजाभिः ॥ (रघुवंश)" (संदर्भ-२)अर्थात हे अग्निदेवा मला माहित होते की छाया सीता माझेच नामस्मरण करीत होती परंतु सामान्य जनतेला तिच्या शुद्धतेवर शंका येऊ नये म्हणून ही परीक्षा घेणे मला एक प्रजापिता म्हणून बंधनकारक होते.
    • यावेळी अग्नी देवाकडून परत येतांना माता सीता सुवर्ण कांतीने झळकून येत होती. अंगावरील सुवर्ण दागिने, लालनल रंगाची साडी, रेशीमप्रमाणेलांबलचक केस, मुखावरील निर्मळ, प्रेमळ सौम्य भाव सीतेच्या शुभ्रकांती ला अधिक तेजस्वी बनवत होते. (संदर्भ ४)
    • येथे रामाचा उद्देश होता की, सामान्य जनतेला अग्निपरीक्षा निमित्ताने आपली मूळ सीता अग्नी देवाकडून मिळविणे हे होय. (इति तुलसी रामायण)

“ रामाने सीता वर संशय घेऊन अग्निपरीक्षा घेतली ” येथे राम चुकीचे वागले आहेत.” असा स्वतःचा मुढ निष्कर्ष आपण कलियुगातील गोष्टीशी तडजोड करून लावतो. हे लक्षात असू द्यावे की रामायण कलियुगातील नव्हते, ते त्रेतायुग होते. शुद्धता -पत्रिव्रात्य नावाच्या गोष्टी होत्या. तत्कालीन काळात सामाजिक परिस्थिती वेगळी होती, कौटुंबिक शिष्टाचार ही वेगळा होता समाज शुध्द होता, लोकं शुद्धता व सिद्धता मापणाने धर्म पालन करायचे.


रामायण समजून घेतांना :

  • रामायण हे वेदांप्रमाणे कर्मकांडात्मक नसून समाज जीवनाला नैतिकता शिकविणारा नैतिक ग्रंथ आहे व मुख्यतः महाकाव्य आहे. त्यामुळे त्याला त्याचप्रमाणे समजून घ्यायला पाहिजे.
  • एक दोन कादंबरी वाचली की आपण त्यातील मूळ पात्राचे Fan होतो. मृत्युंजय वाचली ली कर्ण हिरो होतो तर युगंधर वाचली की कृष्ण हिरो वाटतो त्याचप्रमाणे रावणावरील एक दोन कादंबऱ्या वाचून त्याला हिरो समजणे हे मिथ्य आहे.
  • आपल्या कडे एकूण 3000 प्रकारात रामायण लिहिले गेले आहे तेही वेगवेगळ्या नामासाहित. अखंड भारतवर्षातील सर्व भाषेत रामायण उपलब्ध आहेत. वाल्मिकी पासून तुलसीदास पर्यंत प्रमाण रामायण देखील उपलब्ध आहेत. भारताच्या कोणा कोपर्यात रामायण रुजलेले आहे. (भा. प्रा. सं. मं मिळालेल्या माहितीनुसार)
  • यामुळे जर तुम्हाला रामायणातील हिरो - व्हिलन /आदर्श-अनादर्श शोधायचाच असेल तर अश्या मूळ रामायणाचा अभ्यास करा. वाचून काढा रामायण… पण कृपया please अश्या कोणताही कादंबऱ्या वाचून धर्मग्रंथांची गैरसमज बाळगू नका, मग ते नवे/जुने बायबल असो वा कुर-आनअथवा गीता -महाकाव्ये.
  • रामायणाला रामायणाच्याच दृष्टीने वाचायला हवे, त्यास आजच्या दृष्टीने वाचले की घोळ होणारच. अन पूर्ण गोष्टी माहीत नसतील, कुठुन तरी इंटरनेट वरून माहिती घेऊन स्वतःचे ज्ञान सिद्ध केले जात असेल तर हा षंढ व मूर्खपणा आहे. जर आपणांस माहीत नसल्यास शांत बसून अभ्यास करावे……. ll अभ्यासोनी प्रकटावे ll

••••●।। ll श्री रामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये ll ।। ●••••

__________________________【●】__________________________

चैतन्य आर्य, पुणे…

उत्तर लिखाण वेळ : ८ तास 31 मिनिट.(संदर्भ शोध व लिखाण)

चित्र : राजा रविवर्मा आर्ट गॅलरी व स्वतःच्या संकलनातून…


संदर्भ ग्रंथसूची:

१. श्री रामचरितमानस : गोस्वामी तुलसीदासकृत : अरण्य कांड : (गीताप्रेस_गोरखपूर)

२. रघुवंश : कवी कालिदास विरचित इस (१३५०-१४५०)

३. मूल रामायण : महर्षी वाल्मिकी : अग्निपरीक्षा (गीताप्रेस गोरखपूर)

४. सार्थ श्रीवाल्मीकीरामायण : डॉ. प्र. न. जोशी : युद्धकांड - एकशेपंधरा ते एकशेअठरा सर्ग. ( विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे) १८८६ प्रत.

५. SHREE VALMIKI RAMAYANA (English Edition) : ए. सी. भक्तीवेदांत श्रीलं प्रभूपाद : भक्तीवेदांत बुक ट्रस्ट, मुंबई ( ISKCON's Publication)

…….…जय श्री राम…….

….……हरे कृष्णा……..

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या